धाराशिव (प्रतिनिधी)- परिस्थितीने लहान वयातच ज्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावून घेतले,अशा तीन अनाथ बालकांच्या आयुष्यात आज स्वावलंबनाची नवी पहाट उगवली.केवळ त्यांचे संगोपन करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने या तीन बालकांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन केले.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात तीन अनाथ बालकांना तालुक्यातील तहसील कार्यालयात ‌‘आपले सरकार' केंद्र चालविण्यासाठी मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागाने हा उपक्रम राबविला.प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या माध्यमातून या बालकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत पीएम केअर्समधील कळंब येथील साक्षी शिंदे तसेच बालगृहातील वाशी येथील आकाश जावळे आणि तुळजापूर येथील सिद्धिनाथ अनपट अशा एकूण तीन अनाथ बालकांना‌‘आपले सरकार' केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक कक्षासह संपूर्ण किट त्यांना मोफत देण्यात आले आहे.

अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केवळ निवारा,शिक्षण किंवा तात्पुरत्या मदतीपुरता मर्यादित नसतो.वयाच्या एका टप्प्यानंतर त्यांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि उत्पन्नाचे शाश्वत साधन मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते.याच भूमिकेतून महिला व बाल विकास विभागाने या तीन बालकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आधारातून स्वावलंबनाकडे' नेणारे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आपले सरकार' केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय व ऑनलाइन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देतानाच या तिघांनाही स्वतःचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे.त्यामुळे शासनाच्या संरक्षणाखाली वाढलेल्या या बालकांना आता स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मविश्वासाने पुढील आयुष्य घडविण्याची संधी मिळाली आहे.

तीन अनाथ बालकांसाठी केवळ ‌‘आपले सरकार' केंद्र मिळण्यापुरता मर्यादित न राहता, त्यांच्या स्वावलंबी आयुष्याची नवी सुरुवात ठरला आहे.जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास विभागाच्या या प्रयत्नातून अनाथ बालकांच्या पुनर्वसनाला रोजगाराची जोड देत त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 
Top