धाराशिव  (प्रतिनिधी)-  रस्त्याच्या कडेला बसून ऊन,वारा आणि पावसाचा सामना करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गटई कामगारांना सुरक्षित कामाची जागा मिळावी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागावा,या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांना पत्र्याच्या स्टॉलचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

गटई कामगारांना ऊन,वारा व पावसापासून संरक्षण मिळावे,तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेत निवड झालेल्या सात लाभार्थ्यांना पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार असून,गटई कामासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.त्यामुळे केवळ कामासाठी निवारा नव्हे,तर व्यवसायासाठी आवश्यक साहित्य घेण्यासही या कामगारांना आर्थिक हातभार मिळाला आहे. यापैकी मंगेश नामदेव साबळे,रा.पळसप,ता.धाराशिव, बालाजी सदाशिव शेरखाने,रा.रुईभर, ता.धाराशिव आणि ज्ञानेश्वर गोपाळ माने,रा.रुईभर,ता.धाराशिव या तीन लाभार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलिस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले,विशेष अधिकारी सनम लामकाने,सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

रोजच्या कष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गटई कामगारांसाठी स्वतःच्या व्यवसायाला सुरक्षित जागा मिळणे ही महत्त्वाची बाब आहे.शासकीय अनुदानातून मिळणारा पत्र्याचा स्टॉल आणि साहित्य खरेदीसाठी मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या छोट्याशा व्यवसायाला स्थैर्य देण्याबरोबरच स्वावलंबनाच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 
Top