धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत जनावरांसाठी चारा व पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शेतकरी व पशुपालक आर्थिक अडचणीत असल्याने पशुधनाची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त गावांमध्ये जनावरांसाठी चारा व पाणी छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्याची उपलब्धताही कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांवर आर्थिक संकटाचा अतिरिक्त भार पडत आहे. शासन व प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून आवश्यकतेनुसार चारा-पाणी छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध करून देणे आणि आवश्यक पशुवैद्यकीय सेवा व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
