धाराशिव (प्रतिनिधी)-  पावसाळ्यातील जवळपास साडेतीन महिने संपत आले आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण पावसाळ्यात सरासरीच्या 40 टक्के पेक्षा पाऊस कमी पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीन, मका, उडीद, मुग व ऊस यासह पालेभाज्या, फळभाज्या ही पीके 100 टक्के करपून गेली आहेत. गतवर्षी प्रचंड पावसामुळे शेतीपीकांचे व जमिनीचे नुकसान झाले. यावर्षी पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करुन 50 हजार रूपयांची मदत तातडीने जाहीर करावी. अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार ऐवजी रुपये 2 लक्षचे अनुदान देण्यात यावे. 2009 ते 2026 सालापर्यंतच्या कर्ज माफीतून राहीलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यात यावा. जनावारांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी. पीक विमा कंपनीने रद्द केलेले चार ट्रिगर परत लागु करुन 25 टक्के आग्रीम शेतकऱ्यांना देण्यात यावा. ऊसाचा चालु हंगाम 15 ऑक्टोंबर मध्ये सुरुवात करण्यामुळे कमी साखर उतारा मिळतो. त्यामुळे साखर कारखाने हे कारण पुढे करुन भाव कमी देतात. त्याबद्दल सरकारने खबरदारी घ्यावी. गुळ पावडर कारखान्यांना एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाची बीले येत्या हंगामापासून देण्याचे आदेशीत करावे व गुळ पावडर कारखान्यांना उपपदार्थ निर्मिती करण्याची परवानगी द्यावी. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील कांही साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या ऊसाचे बील राहीले आहे ते देण्याचे आदेशीत करावे. परतीचा मानसुन मध्ये कृत्रीम पाऊस पाडण्याबाबत कारवाई करण्यात यावी. येत्या आठ दिवसामध्ये याची पूर्तता न झाल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.


 
Top