तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणरायाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर नगरीत शेकडो वर्षांची धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा जपणारे ‘आडातला गणपती' मंदिर आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. मात्र, यंदा तुळजापूर तालुक्यात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने या प्राचीन मंदिराचे वैशिष्ट्य असलेले आडातील पाणीच आटले आहे. त्यामुळे नेहमी पाण्यात असणारा गणराय यंदा पाण्याविना दिसत असून, भाविकांना गर्भगृहात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आडातील पाण्याची पातळी वाढते आणि गणेशमूर्ती पाण्याच्या सान्निध्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात मंदिर पाण्यात असताना येथे येणारे अनेक भाविक आडातील पाण्याची पूजा करतात. यंदा दुष्काळामुळे आड कोरडा पडला असून, यंदा भाविकांना आडातील पाण्याची पूजा करण्याऐवजी गर्भगृहात जाऊन श्री गणरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येत आहे.
इ.स. 1704 मध्ये मूर्ती सापडल्याची आख्यायिका
तुळजापूर शहरातील हे अतिप्राचीन गणेश मंदिर तब्बल 60 फूट खोल आडामध्ये असल्याचे सांगितले जाते. उपलब्ध माहितीनुसार, इ.स. 1704 मध्ये आडाचे काम सुरू असताना या ठिकाणी गणेशाची मूर्ती सापडली, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर याच ठिकाणी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून या स्थानाला ‘आडातील गणपती' म्हणून विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तुळजापूरच्या प्राचीन धार्मिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीकही मानले जाते.
प्राचीन धार्मिक ठेवा जतन करण्याची गरज
तुळजापूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशात ‘आडातला गणपती' या मंदिराला विशेष स्थान आहे. शेकडो वर्षांची परंपरा, इ.स. 1704 शी जोडली गेलेली आख्यायिका, हेमाडपंथीय दगडी बांधकाम आणि आडातील गणेशमूर्तीची अनोखी परंपरा यामुळे हा अमूल्य धार्मिक-ऐतिहासिक ठेवा आहे. या प्राचीन मंदिराचे स्थापत्य, दगडी बांधकाम आणि धार्मिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्याचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याचे भाविक व स्थानिकांकडून बोलले जात आहे.
