धाराशिव (प्रतिनिधी)- हातात कौशल्य आले की परिस्थिती बदलण्याची ताकद निर्माण होते. याच विचारातून सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या पुढाकाराने धाराशिव जिल्ह्यातील गरीब, गरजू महिला आणि एकल मातांना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उत्तम प्रतीच्या शिलाई मशिनही विनामूल्य देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला केवळ काम मिळाले नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासालाही नवी दिशा मिळाली आहे.

कळंब आणि वाशी तालुक्यात सेरेंटिका रिन्यूएबल्सकडून पवनचक्क्यांच्या माध्यमातून हरित ऊर्जा निर्मिती केली जात आहे. या भागातील सामाजिक गरज लक्षात घेऊन कंपनीच्या पुढाकारातून 1 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत येरमाळा येथे 20 महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थी महिलांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच निवासस्थानापासून प्रशिक्षण केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहनाची सुविधाही देण्यात आली.

तुळजापूर येथील जय हनुमान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा प्रस्ताव सेरेंटिका रिन्यूएबल्सकडे देण्यात आला होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कंपनीने या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिली. प्रशिक्षणादरम्यान महिलांना शिलाई मशिन हाताळणीबरोबरच कटिंग, ब्लाउज, परकर, फ्रॉक, वनपीस आदी कपडे शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 मार्च 2026 रोजी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. यावेळी उषा कंपनीच्या शिलाई मशिनचेही महिलांना वाटप करण्यात आले.


सात महिलांनी उभारला आत्मनिर्भरतेचा संसार

या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेत आजमितीस मनिषा समाधान शिंदे, संगीता रामचंद्र लबड, ज्योती विष्णू शिंदे, सुवर्णा महावीर जोगदंड, दीक्षा राजेंद्र गाडे, ज्योती हनुमंत तौर आणि अश्विनी तात्यासाहेब सातपुते या सात महिला शिवणकामातून उत्पन्न मिळवत आहेत.

विशेष म्हणजे प्रशिक्षणाचा लाभ केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता या महिलांनी आपल्या गावातील मुलींनाही शिवणकाम शिकवण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांनी गावात शिलाई शाळा सुरू केल्या असून त्या गृहउद्योजिका म्हणून पुढे येत आहेत.


65 प्रशिक्षणार्थी, दीड लाखांहून अधिक उत्पन्न

सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत महिलांनी सुरू केलेल्या शिलाई शाळांमध्ये आजमितीस सुमारे 65 प्रशिक्षणार्थी असल्याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींकडून साधारणपणे महिन्याला 500 ते 700 रुपये शुल्क घेतले जाते. त्यामुळे एका शिलाई शाळा संचालिकेला महिन्याला सुमारे तीन ते सव्वातीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. काही केंद्रांमधून महिन्याला 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले.

महिलांनी प्रशिक्षणार्थी शुल्कातून 58 हजार 300 रुपये, शिवणकामातून 90 हजार 400 रुपये, तर शिलाई मशिन दुरुस्ती व इतर संबंधित उपक्रमांतून सुमारे सात हजार रुपये उत्पन्न मिळवले आहे. अशा विविध माध्यमांतून आतापर्यंत एकूण सुमारे 1 लाख 56 हजार रुपयांचे अर्थार्जन झाल्याची माहिती देण्यात आली.

वाशी तालुक्यातील दीक्षा राजेंद्र गाडे यांनी ‌‘उषा शिलाई शाळा' सुरू केल्यानंतर विविध माध्यमांतून 25 हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत या उपक्रमातील सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या गृहउद्योजिकेचा मान मिळवल्याचे सांगण्यात आले.


‌‘महिलांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा'

या प्रशिक्षण शिबिराचे संयोजक हनुमंत तौर म्हणाले, “या उपक्रमामुळे सात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लावत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही प्रशिक्षणाचा आणि शिलाई मशिनचा योग्य उपयोग करावा. अनेक महिला आता गावातील मुलींना शिवणकाम शिकवत आहेत. सेरेंटिका रिन्यूएबल्सने महिलांना केवळ मशिन दिले नाही, तर त्यांच्या हाताला कौशल्य आणि आत्मविश्वास दिला आहे.”


हरित ऊर्जेसोबत सामाजिक बांधिलकी

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित ऊर्जेला प्रोत्साहन देतानाच सेरेंटिका रिन्यूएबल्सकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले. वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ वॉटर प्लांट, स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण तसेच नवरात्रोत्सव काळात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा अशा विविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे. हरित ऊर्जेच्या निर्मितीसोबतच स्थानिक महिला व युवकांच्या कौशल्यविकासाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमामुळे संबंधित महिलांच्या जीवनात आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट निर्माण झाली आहे.

 
Top