तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वलगाव-वडगाव लाख परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. आधीच पावसाअभावी दुष्काळाच्या संकटाला तोंड देणाऱ्या बळीराजासमोर आता वीजपुरवठ्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. वीज नसल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन वाळत असून उसालाही फटका बसत असल्याने संतप्त झालेल्या वडगाव लाख येथील शेतकरी तुकाराम बिरदेव सोनटक्के यांनी चक्क धनगर डीपीवर चढून संताप व्यक्त केला.
सोनटक्के हे डीपीवर चढल्यानंतर, “तीन दिवस झाले वीज नाही. सोयाबीन आणि ऊस वाळत चालला आहे. बारूळ सबस्टेशनकडून दुपारी बारा वाजता वीज सुरू करण्याची वेळ सांगितली होती; मात्र अद्याप वीज सुरू झालेली नाही. आता मी काय करायचे?“ असा सवाल करत त्यांनी डीपीवरील तारेला हात लावून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. वडगाव लाख, बारूळ, पन्हाळा या गावातपण कमी दाबाने वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी त्यांना हात जोडून खाली उतरण्याची विनंती केली. “आमदार-खासदारांशी बोलू, वीजपुरवठा सुरळीत करून घेऊ,“ असे आश्वासन देत ग्रामस्थांनी सोनटक्के यांना समजावून सांगितले. अखेर त्यांना गोड बोलून डीपीवरून खाली उतरवण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला.
