तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरात मिरवणुकांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी तुळजापूर शहरवासीय व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सार्वजनिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे आणि प्रखर लेझर शोचा वापर केला जातो. यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच प्रकाश प्रदूषणाची समस्या निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो त्या पार्श्वभूमीवर , गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये डीजे व लेझरचा वापर करणाऱ्या मंडळांना परवानगी देण्यात येऊ नये. तसेच विनापरवाना डीजे अथवा लेझरचा वापर करून मिरवणूक काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सार्वजनिक मंडळांनीही डीजे मुक्त उत्सव साजरे करण्याची विनंती निवेदनकर्त्यांनी केली आहे अशीही मागणी करण्यात आली आहे.
चर्चेत असतानाच, आता तीर्थक्षेत्र तुळजापुरातही अशाच प्रकारची बंदी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर शहरात धार्मिक वातावरणाला बाधा पोहोचू नये. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि ध्वनी व प्रकाश प्रदूषणावर नियंत्रण मिळावे, यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनावर शेकडो शहरवासीयांच्या स्वाक्षरी आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन डीजे व लेझरच्या वापराबाबत काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.