तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाने तब्बल महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन पीक पाण्याअभावी जागेवरच वाळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे.
महसूल-कृषी विभागाचे संयुक्त पथक तातडीने पाठवा : धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. पीकविमा कंपन्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 72 तासांच्या आत विम्याची रक्कम जमा करावी. खरीप कर्जमाफी, रब्बीसाठी बिनव्याजी कर्ज : शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील कर्ज माफ करून रब्बी हंगामासाठी बिनव्याजी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मलिकार्जुन कुंभार, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, सोमेश्वर आलुरे आणि समीर शेख यांनी दिला.
