धाराशिव (प्रतिनिधी)-  पावसाअभावी खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेलेली आहेत. जनावरांना चारा नाही तर भविष्यात पाण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भेडसावणारी आहे. पिके वाया गेल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया राबवावी. या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव तालुक्यातील येडशी येथे छत्रपती संभाजीनगर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. दीड तास हे आंदोलन चालल्यामुळे दुतर्फा तीन-तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पावसाच्या 45 टक्के तुटीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीन, मका, उडीद, मुग व ऊस यासह पालेभाज्या, फळभाज्या आदी पिके 100 टक्के करपून गेली आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी प्रचंड पावसामुळे शेती पिकांचे व जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. तर यावर्षी पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीने मदत करावी. तसेच नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. 2009 ते 2026 पर्यंतच्या कर्ज माफीतून राहीलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यात यावा. जनावारांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी. पीक विमा कंपनीने रद्द केलेले चार ट्रिगर पुन्हा लागू करुन 25 टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करीत आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन स्विकारले.

यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक संजय पाटील दुधगावकर, दयानंद पाटील, सुरेश नाईकनवरे, इकबाल पटेल, औदुंबर धोंगडे, बब्रुवान वाकुरे, सतीश माने, दिनेश खुणे, संदीप जाधव, सचिन शेळके, भागवत पाटील, श्याम पाटील, लक्ष्मण शिरसाट, चंद्रकांत पाटील, विजय शेळके, महादेव शेळके, शामसुंदर पाटील, संजय नवले आदींसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top