तुळजापूर (प्रतिनिधी)-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तुळजापूर खुर्द येथे वाळलेल्या सोयाबीनच्या काडाची होळी करून शासनाचा निषेध करण्यात आला. विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी रवींद्र इंगळे यांनी तालुक्यात मागील 40 ते 45 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, मूग, उडीद यांसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा केला. शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासन दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त पाहत आहे का? असा सवाल करत दुष्काळ जाहीर होईपर्यंत गावोगावी वाळलेल्या पिकांची होळी करून आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा इंगळे यांनी दिला. मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या बैठकीच्या संदर्भातही त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली. शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी बैठकीत काजू-बदाम खात असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यात गावोगावी वाळलेल्या पिकांची होळी करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष गुरुदास भोजने, निलेश काटे, विकास भोजने, सतीश अण्णा साळुंखे, राजेभाऊ हाके, धनाजी पेंदे, धोंडीबा जगदाळे, सतीश डाके, खंडू भोजने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले 

 
Top