धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक गतिमान, प्रभावी आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची धाराशिव-कळंब तालुक्यांची संयुक्त बैठक धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा समितीचे अध्यक्ष  आमदार . कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील सभागृहात संपन्न झाली.

धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळाची स्थिती, रिक्त पदे तसेच आरोग्य संस्थांसमोरील विविध अडचणी व समस्यांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, समितीचे सदस्य सचिव  डॉ. प्रमोद गिरी, आरोग्य अधिकारी, कळंब डॉ. गोवर्धन महिंद्रकर आदींनी माहिती दिली. बैठकीत धाराशिव-कळंब मतदारसंघातील विविध आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्धता, रिक्त पदे, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री, औषधांचा पुरवठा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या समस्या तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती तथा समिती सदस्य विश्वास कोकणे, महिला व बालकल्याण सभापती तथा समिती सदस्य पूजा तुषार शिंदे, तसेच समिती सदस्य गोकर्ण कदम यांनी विविध आरोग्यविषयक बाबी व समस्या बैठकीसमोर मांडल्या.

आरोग्य संस्थांमधील अडचणी आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतल्यानंतर संबंधित विभागांनी त्यावर तातडीने व प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती द्यावी, अशा सूचना समितीचे अध्यक्ष तथा आमदार श्री. कैलास पाटील यांनी दिल्या. याशिवाय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर तसेच दोन्ही तालुक्यांतील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top