तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरसह पंचक्रोशीत श्री गोकुळाष्टमीचा धार्मिक आणि पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमीच्या दिवशी शुक्रवारी दि. 6 रोजी सायंकाळी अनेक घरांमध्ये घरोघरी श्री गोकुळाची विधिवत पूजा करण्यात आली. मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
घाटशिळवर साकारला श्रीकृष्णाचा आकर्षक अवतार
तुळजापूरच्या घाटशिळ डोंगरावर असलेल्या श्री बारा ज्योतिर्लिंग मंदिरात भगवान श्रीकृष्णाची आकर्षक अवतार पूजा साकारण्यात आली होती. या पूजेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक धार्मिक वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
मुद्गुलेश्वर मंदिरात ‘कालियामर्दन' महापूजा
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री मुद्गुलेश्वर मंदिरात भगवान श्री मुद्गुलेश्वरांची ‘श्री कृष्ण कालियामर्दन' महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात वास्तव्य करणाऱ्या विषारी कालियानागाचा मर्दन करून यमुना नदीला विषमुक्त केले, या दिव्य लीलाचे दर्शन या महापूजेतून घडत होते. आकर्षक धार्मिक सजावट आणि पूजेच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या या अद्भुत पराक्रमाचे दर्शन भाविकांना घडले.
‘हरि-हर' एकात्मतेचा संदेश
हिंदू धर्मपरंपरेनुसार समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हलाहल विष भगवान महादेवांनी आपल्या कंठात धारण करून सृष्टीचे रक्षण केले, अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी कालियाच्या विषाने दूषित झालेल्या यमुना नदीचे रक्षण करून विषारी शक्तीवर विजय मिळविला. या दोन्ही दिव्य कथांमधून विषावर विजय, सृष्टीरक्षण आणि हरि-हराच्या एकात्म तत्त्वाची अनुभूती भक्तांना होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दहीहंडीने रंगला गोकुळाष्टमी सप्ताह
दरम्यान, शनिवार दि. 5 रोजी दुपारी श्री गोकुळाष्टमी सप्ताहानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शाळांमध्येही ‘राधाकृष्ण' अवतरले!
गोकुळाष्टमीचा उत्साह केवळ मंदिरांपुरता मर्यादित राहिला नाही. विविध शाळांमध्येही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चिमुकले बाळगोपाळ राधा-कृष्णाच्या वेशात शाळेत दाखल झाले. त्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे शाळांमध्ये जणू गोकुळच अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धार्मिक परंपरा, भक्तीभाव, दहीहंडीचा जल्लोष आणि चिमुकल्यांच्या राधाकृष्ण वेशभूषेमुळे तुळजापूर पंचक्रोशीत गोकुळाष्टमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात रंगला.

