तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगर परिषदेच्या शाळांमध्ये आता आधुनिक सुविधांची भर पडणार असून, नगर परिषदेच्या सर्व शाळा लवकरच वातानुकूलित (एसी) करण्यात येणार आहेत, अशी मोठी घोषणा नगराध्यक्ष विनोद (पिटु) गंगणे यांनी केली. शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद शाळा क्र. 3 (तुळजापूर खुर्द) येथे आयोजित शिक्षक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

“तुळजापूरच्या नगर परिषद शाळा महाराष्ट्रातील उत्तम दर्जाच्या शाळा बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असा निर्धार गंगणे यांनी व्यक्त केला. यावेळी नगर परिषद शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या 25 हून अधिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला उपाध्यक्ष रामचंद्र रोचकरी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, गटनेते औदुंबर कदम, अमोल कुतवळ तसेच शिक्षण सभापती नीता क्षीरसागर यांच्यासह नगर परिषद पदाधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

गुणी विद्यार्थिनीची मातृभूमीला ‌‘गुरुदक्षिणा'!

दरम्यान, याच कार्यक्रमात नगर परिषद शाळा क्र. 3 ची माजी विद्यार्थिनी डॉ. प्रतीक्षा पंडितराव जगदाळे यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली. डॉ. जगदाळे यांनी आपल्या वैद्यकीय स्टायफन्डमधील 30 हजार 500 रुपयांचा धनादेश शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांच्याकडे सुपूर्द केला. आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करत डॉ. प्रतीक्षा जगदाळे यांनी ‌‘गुरुदक्षिणे'चा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे आणि शाळेबद्दलच्या ऋणनिर्देशाचे उपस्थितांनी कौतुक केले. शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा आणि माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग, यामुळे शिक्षक दिनाचा हा सोहळा विशेष ठरला.

 
Top