धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी व आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सातत्याने केलेल्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नियम आणि योग्य प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभाग तसेच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने आवश्यक निर्देश दिले आहेत.
नवीन निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रमांसाठी संहिता, निवेदन व सादरीकरणाची तपासणी तसेच मंडळाचे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नियमानुसार आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विशेषतः पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे म्युझिकचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या निर्णयामुळे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध झाली आहेत. हा निर्णय केवळ एका विभागाची मागणी नसून महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लावणी आणि सांस्कृतिक परंपरेचे पावित्र्य जपण्यासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून सांगण्यात आले.
या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष विशाल शिंगाडे यांचे कौतुक होत असून, धाराशिव जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.