धाराशिव (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणुजन्य तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत जलद ताप सर्वेक्षण,कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानंतर पुढील तीन महिने प्रत्येक महिन्याच्या 2 आणि 17 तारखेला नियमित ताप सर्वेक्षणासोबत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या तीन दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व 737 गावांसह शहरी भागात आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जलद ताप सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर ज्या गावांमध्ये तापाच्या रुग्णसंख्येत वाढ तसेच डासांच्या अळ्यांची घनता अधिक असल्याचे आढळून येईल,त्या ठिकाणी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
ताप वाढलेल्या भागात ‘फिव्हर क्लिनिक'
ज्या भागात तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येईल, तेथे वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ‘फिव्हर क्लिनिक'द्वारे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कार्यवाही केली जाणार आहे.आरोग्य पथके प्रत्यक्ष भेटी देऊन तापाच्या रुग्णांना उपचार देतील.तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत गावांतील दूषित पाणीसाठ्यांमध्ये अबेट टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये ‘कोरडा दिवस' पाळण्याबरोबरच नागरिकांमध्ये ताप आणि डासजन्य आजारांच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा मुबलक साठा
जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या स्तरावर आरोग्य विभागाने औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र,तालुका आणि जिल्हास्तरावरून या संपूर्ण मोहिमेचे सनियंत्रण करण्यात येत आहे.डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत विभागाकडे 73 फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत.
घराभोवती पाणी साचू देऊ नका
आरोग्य विभागाने नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपल्या घरासह परिसराची स्वच्छता राखावी, डासांची उत्पत्ती होऊ शकणारी ठिकाणे नष्ट करावीत,घर व परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मच्छरदाणीचा वापर करावा. विशेषतः तापाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.ताप आल्यास अंगावर न काढता त्वरित नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन उपचार घ्यावेत.
ताप सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे.ताप किंवा डासजन्य आजारांसंदर्भात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास जिल्हा आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा बांगर आणि प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनशील कुलकर्णी यांनी केले आहे.