धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इंग्रजी विभाग व महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने संवाद कौशल्यावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संवाद कौशल्यावर अधिक भर दिला गेला असून, याच अनुषंगाने इंग्रजी विभागांतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गोविंद कोकणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, उपकेंद्र धाराशिव यांनी वरील प्रतिपादन केले.व्यक्तिमत्व विकासामध्ये सॉफ्ट स्किल्सची भूमिका या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाषा आज केवळ संवादाचे माध्यम म्हणून कार्य करत नाही तर आज भाषा एक संवाहक म्हणून कार्य करत आहे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचा दर्जा आज बौद्धिक गुणवत्ता वाढीबरोबरच आर्थिक दृष्ट्या सुध्दा मानवाला समृद्ध करत आहे,भाषा संवाहक असते याचाच अर्थ आज आपणांस भाषा ही प्रगती पथावर घेऊन जाण्यास तयार आहे आपल्याला त्या भाषेकडे जाणे गरजेचे आहे.आपणास ज्ञात असणाऱ्या सर्व भाषा या व्यवस्थित आत्मसात कराव्यात म्हणजेच भाषिक सॉफ्ट स्किल्स अंगिकरणे गरजेचे आहे.स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, अब्राहम लिंकन, रस्किन बोंड ही माणसं भाषिक कौशल्य आत्मसात करून यशस्वी झाली आहेत, योग्य ठिकाणी योग्य भाषेचा वापर करावा असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रास्ताविक इंग्रजी विभाग डॉ.सी .आर दापके यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.लक्ष्मण भरगंडे यांनी केले.सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले,डॉ.मारुती लोंढे यांच्या सह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा. डॉ संजीवनी जाधव यांनी मानले.
