तुळजापूर (प्रतिनिधी)-  स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत गणेशोत्सवाला यंदा महिलांच्या सहभागाची नवी किनार लाभली आहे. प्रतीक्षानगरातील कृष्ण सोसायटी परिसरातील महिलांनी एकत्र येत प्रथमच स्वतंत्र गणेश मंडळाची स्थापना केली असून, महिलांच्या पुढाकारातून गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. महिलांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेशोत्सव हा केवळ पुरुषप्रधान धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जाणीवा जपणारे प्रभावी माध्यम ठरावे, या उद्देशाने महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांनी एकत्र येऊन उभारलेले हे गणेश मंडळ महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जागृत करणारे प्रेरणादायी पाऊल ठरत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील महिला, युवक आणि नागरिकांना एका व्यासपीठावर आणून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

गणेश मंडळाच्या स्थापनेसाठी स्वाती बागल, पूनम लाटे, उलपा मोटे, इंदूबाई राठोड, श्वेता जाधव, छाया शिंदे, मोनाली कळसाईत, पूजा गोसावी, कमल लोखंडे, गीतांजली जाधव, अंजली व्यवहारे, प्रगती व्यवहारे, ज्योती गधुरे, पूजा पाटील, सुमित्रा गीते, राधा जायभाय, माधुरी जगताप, संजीवनी हगवणे, प्रियंका गंदुरे यांच्यासह कृष्ण सोसायटीतील अनेक महिलांनी पुढाकार घेतला आहे.




 
Top