धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी दर्शन दिवटे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आयटी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांची डेटा इंजिनिअर म्हणून तब्बल 17.2 लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. सध्या ते अमेरिकास्थित कंपनीमध्ये स्कील डेव्हलोपमेंट  आणि प्रोफेशनल सोलुशन विभागात कार्यरत आहेत.

नुकतीच त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या यशामागील महाविद्यालयीन शिक्षण, कौशल्यविकास आणि नेतृत्वगुणांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.

दर्शन दिवटे म्हणाले की, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव मध्ये शिक्षण घेत असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगसोबत विविध सिस्को कोर्सेस व कौशल्यविकासाच्या संधी महाविद्यालयात मिळाल्या. त्याचा प्रत्यक्ष फायदा आजच्या नोकरीमध्ये होत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही केवळ पारंपरिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून आज आयटीसह विविध क्षेत्रांमध्ये मेकॅनिकल अभियंत्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डिझाइन इंजिनिअरिंगमधील सॉफ्टवेअरचे ज्ञान, तांत्रिक समस्या सोडविण्याची क्षमता आणि संगणकीय कौशल्ये यामुळे मेकॅनिकल अभियंते आयटी क्षेत्रातही उत्तम कामगिरी करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

“मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांची दारे खुली आहेत. तांत्रिक ज्ञानासोबत सॉफ्टवेअर व कौशल्यविकासावर भर दिल्यास उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात. माझे यश हे त्याचेच उदाहरण आहे,” असेही दिवटे यांनी नमूद केले.

महाविद्यालयात असताना मेकॅनिकल इंजीनियरिंग स्टुडन्ट असोसिएशन चे प्रेसिडेंट म्हणून काम केल्याचा अनुभवही त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा ठरला. या जबाबदारीमुळे नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि टीमवर्कची भावना विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, मार्गदर्शक आणि संपूर्ण शैक्षणिक वातावरणाला दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले की, “शहरी भागातील पुणे-मुंबई आणि धाराशिवसारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने कोणताही फरक नाही. उलट, धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या कौशल्यांना वाव देण्याचे काम केले जाते. त्यामुळेच तेरणा महाविद्यालयातील विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.”

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख आणि अकॅडमी डीन  डॉ. डी. डी. दाते यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आपला विद्यार्थी टॉप पोझिशनवर पोहोचतो, तेव्हा तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. तेरणाचे अनेक विद्यार्थी आज नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या यशातून महाविद्यालयाला सातत्याने आनंद आणि अभिमान मिळत आहे.”

कु.दर्शन दिवटे यांच्या  यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माझी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभागप्रमुख, विभागातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले. तिची ही निवड फार्मसी विभागातील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शन दिवटे यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


 
Top