तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तामलवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. 3) तामलवाडी गावासह तामलवाडी टोलनाक्यावरील व्यापारी व व्यावसायिकांनी आपली दुकाने, हॉटेल्स व अन्य व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.
टोल नाक्यावर बंदला प्रतिसाद
तामलवाडी गावासह टोलनाक्यावरील व्यावसायिकांनीही दुकाने व हॉटेल्स बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दवाखाने, मेडिकल यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार शांततेत बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, सकल मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला तामलवाडीतील इतर समाजातील नागरिकांनीही पाठिंबा दिला. सामाजिक एकोपा दाखवत नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.
