तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात हिंदूंच्या प्रमुख सणासुदीच्या काळात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरवासीयांना बसत आहे. एकीकडे भरदिवसा पथदिव्यांची विद्युत  दिवे सुरू, तर दुसरीकडे  घरगुती वीजपुरवठा  बंद, चालू रात्री अचानक वीज गायब अशी विसंगत परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर घरगुती कामे करणाऱ्या नागरिकांसह महिलांची मोठी गैरसोय होत असून, महावितरणचा हा अजब-आगळावेगळा कारभार सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्या श्री गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी सुरू आहे. घरांची साफसफाई, सजावट, स्वयंपाकाची तयारी यासह विविध कामांना वेग आला आहे. मात्र, त्याचवेळी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे.

कधी अर्धा तास, तर कधी एक तास वीज गायब होत असल्याने सणासुदीची कामे वेळेत पूर्ण करताना महिलांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांची स्पष्ट माहिती नागरिकांना मिळत नसल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे.. जिथे प्रकाशाची गरज आहे, तिथला विद्युत प्रकाश बंद; आणि जिथे भरदिवसा प्रकाशाची गरज नाही, तिथे पथदिवे सुरू, अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

किमान सणासुदीच्या दिवसांत तरी पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा ठेवावा; अन्यथा महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 
Top