धाराशिव (प्रतिनिधी)- धुळे जिल्ह्यातील नरवाळ परिसरात गर्भवती महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या पुरुष व महिला आरोपीला कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले. फारुख हजु शेख (वय 29, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह.मु. शेरे गल्ली, कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय 26, रा. जामखेड कला केंद्र, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा मोबिलिओ कारही कळंब शहरातून जप्त करण्यात आली आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी नरवाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गालगत मुरमा टेकड्यांच्या परिसरातील वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका अनोळखी गर्भवती महिलेचा मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाणे, जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मृत महिला ही नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. जामखेड कला केंद्र) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (वय 38), आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख (वय 31), लक्ष्मी बालाजी पवार (वय 30) आणि स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे या चार आरोपींना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, फारुख शेख व रोहिणी जाधव हे दोघे फरार होते. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोबिलिओ कारही फरार आरोपींसह पोलिसांच्या शोधात होती. दि. 27 सप्टेंबर रोजी कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत फरार महिला व पुरुष आरोपी कळंबहून केज रोडवर जेवणासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केज रोडवरील सातबारा हॉटेलसमोर सापळा रचला. यावेळी दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी आरोपींची नावे व ओळख निश्चित करून त्यांचे छायाचित्र मोहाडीनगर पोलिसांना पाठविले. खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मोहाडीनगर, जि. धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याचदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा मोबिलिओ कार कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळून आली. कारची नंबर प्लेट काढलेली होती. तपासात तिचा क्रमांक एमएच 43 एआर 4070 असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तीही मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलिस हवालदार महादेव मुंडे, पोलिस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलिस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केली.