तुळजापूर (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तामलवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा', ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', ‘जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. तामलवाडीसह सुरतगाव, गंजेवाडी, वडगाव काटी, पिंपळा खुर्द-बु., सांगवी काटी, पांगरदरवाडी, देवकुरुळी, धोत्री आदी परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
