धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अटक करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षांत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आयोग सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाल्याने आयोगाच्या कारभारातील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.
जिल्हा काँग्रेसने निवेदनात असा दावा केला आहे की, विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात आहेत. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त श्री. सुखबीर सिंग संधू आणि श्री. विवेक जोशी यांनी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या दहा महिन्यांत किमान 14 वेळा त्यांच्या निर्णयांवर अधिकृत आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार, प्रक्रिया, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भातील निर्णय सहकारी आयुक्तांना विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कार्यपद्धती लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावे वगळल्याचा, बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे हटविण्यात आल्याचा तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान मतदार यादीत कथित अनियमितता झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकारांबाबत पुरावे सादर केल्याचा उल्लेख करत या सर्व प्रकरणांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच शासनाने जाहीर केलेली दुष्काळाच्या जीआरची यावेळीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. या जीआर मधून शासनाची स्पष्टता दिसून येत नाही. हा जीआर काढून एक प्रकारे फसवणूक केली. तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने हेक्टरी एक लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना सरसकट द्यावी अशी मागणी करण्यात आली.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजेंद्र शेरखाने, मलंग शेख, पांडुरंग तात्या कुंभार, प्रशांत पाटील,विलास साळू, खलील सय्यद, ॲड.सय्यद इनामदार,धनंजय राऊत, ॲड.जावेद काझी, अग्निवेश शिंदे,विनोद वीर, आप्पासाहेब शेळके,दयानंद पाटील, सोमनाथ मिश्किन, सिराज मोगल, अमर तागडे, अरविंद बागडे, अर्जुन बिराजदार, पृथ्वीराज देशमुख, महबूब पटेल, अमोल कुतवळ, गोदावरी केंद्रे,मनीषा वाघमारे, मिलिंद गोवर्धन,शिवानंद तोडकर, महेश म्हेत्रे,गणेश पवार, सरफराज काझी, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे,संकेत पडवळ, फुरखान शेख, आबेदीन कुरेशी , नसीर इनामदार, सईद बागवान,पोपट शिंदे, मोईज सय्यद,भारत काटे, जीवन चौगुले तसेच प्रदेश पदाधिकारी,सर्व सेलचे प्रमुख सर्व तालुका कार्याध्यक्ष,शहराध्यक्ष,महिला, विद्यार्थी, युवक यांच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणात तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
