तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांकडून श्रद्धेपोटी तसेच नवसपूर्तीसाठी अर्पण करण्यात येणाऱ्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांकडून अर्पण होणारे सोने-चांदी सुरक्षित ठेवण्यासाठी असलेला मंदिर संस्थानचा जामदारखाना स्ट्राँग रूम आता पूर्ण क्षमतेने भरल्याने मंदिर प्रशासनापुढे नव्या प्रश्नाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे भाविकांकडून दानरूपाने प्राप्त झालेले सोने-चांदी वितळविण्याबाबत मंदिर संस्थानकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट परवानगी घेण्यात आलेली आहे.

सोने-चांदी वितळविण्याच्या प्रक्रियेसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची मंजुरी घेण्यात आली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. विधी व न्याय विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच सोने-चांदी वितळविण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे.


सध्या मंदिर संस्थानकडे किती सोने-चांदी?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे सध्या भाविकांनी अर्पण केलेले 247.997 किलो सोने आणि सुमारे 3298 किलो चांदी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये   आई तुळजाभवानी मातेचे पुरातन सुवर्ण अलंकार व दागिने असलेल्या सात पेट्यांचाही समावेश आहे. हे पुरातन दागिने मंदिराच्या धार्मिक व ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानले जातात. दरम्यान, भाविकांकडून नवसपूर्तीसाठी तसेच श्रद्धेपोटी सोन्या-चांदीचे दागिने, अलंकार आणि अन्य वस्तू मोठ्या प्रमाणावर अर्पण केल्या जातात. मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि धार्मिक श्रद्धेचे प्रमाण पाहता या दानात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले जाते.


सुरक्षिततेमुळे जामदारखान्यातच ठेवले जाते सोने

भाविकांकडून अर्पण झालेले सोने-चांदी व दागिने मंदिर संस्थानच्या जामदारखान्यातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवले जातात. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने दागदागिन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, वर्षानुवर्षे जमा होत गेलेल्या दागिन्यांमुळे आता स्ट्राँग रूमची साठवण क्षमता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने प्राप्त होणारे सोने-चांदी सुरक्षितपणे कुठे ठेवायचे, हा प्रश्न मंदिर प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जमा असलेल्या सोने-चांदीचे व्यवस्थापन करण्यासाठी वितळविण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे समजते.



विधी व न्याय विभागाच्या मंजुरीकडे लक्ष

सोने-चांदी वितळविण्याच्या प्रस्तावाला मंदिर संस्थानच्या पातळीवर मंजुरी घेण्यात आली असून आता शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सोने-चांदी वितळविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, आई तुळजाभवानीच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले सोने-चांदी वितळविणे योग्य ठरेल का? त्यातून प्राप्त होणाऱ्या सोन्या-चांदीचे पुढे काय केले जाणार? त्याची नोंद व लेखापरीक्षण कसे होणार? या प्रश्नांकडेही भाविक आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 
Top