तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून पीकविम्याचा भरणा घेऊनही त्यांचे विमा अर्ज नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मागील वर्षी निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीच्या तुलनेत शेतकऱ्यांना अत्यल्प पीकविमा मंजूर करण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुळजापूर येथील रविंद्र भिमाशंकर इंगळे यांनी 31 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाच्या प्रती कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.


भरणा घेतला, मग विमा नाकारला?

शेतकऱ्यांनी नियमानुसार पीकविम्याचा भरणा करूनही विमा कंपनीकडून तब्बल 12 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही त्या तुलनेत अत्यल्प पीकविमा मंजूर करण्यात आल्याची तक्रार शेतकरी संघटनेने केली आहे.


कृषी विभागाकडे चौकशीची जबाबदारी

जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना संबंधित अर्जाची छायांकित प्रत पाठविली आहे. अर्जावर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून अर्जदाराला आपल्या स्तरावरून माहिती देण्याचे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


शेतकऱ्यांच्या नजरा आता कृषी विभागाच्या कार्यवाहीकडे

पीकविम्याचा भरणा करूनही विमा नाकारण्यात आल्याच्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे. विमा कंपनीने कोणत्या कारणांमुळे अर्ज नाकारले, संबंधित शेतकऱ्यांकडून भरणा स्वीकारल्यानंतर दावे का फेटाळले आणि मागील वर्षीच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यल्प विमा मंजूर का करण्यात आला, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतर आता कृषी विभागाकडून या तक्रारीवर कोणती कार्यवाही केली जाते आणि 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रकरणांचा निकाल काय लागतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

 
Top