तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तडवळा येथील प्रदीप उर्फ सोन्या धनाजी चंदनशिवे (वय 16) या बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने तडवळा परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप आई-वडिलांस एकुलता एक मुलगा होता. प्रदीप ह्याचे आई-वडील अतिशय गरीब कुटुंबातले असून ते मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करत होते.
प्रदीप हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवार सकाळी तो राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदीपच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी, आजी-आजोबा, चुलते असा परिवार आहे. त्याच्यावर तडवळा येथे सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
