भूम (प्रतिनिधी)-  सावरगाव (देवग्रा) व माणकेश्वर परिसरातील शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे रखडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भूम तहसीलदारांच्या दालनात डिझेल घेऊन ठिय्या आंदोलन केले. सुमारे चार तास आंदोलन सुरू होते. अखेर प्रशासनाने दोन दिवसांत आवश्यक मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करून ई-पिक पाहणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेत आंदोलन स्थगित केले.

सावरगाव (देवग्रा) येथील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी होत नसल्याबाबत यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी महसूल प्रशासनाकडे निवेदन दिले होते. तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास वारंवार समस्या आणूनही तांत्रिक अडचण दूर झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. माणकेश्वर महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आहेत. अशा परिस्थितीत ई-पिक पाहणी न झाल्यास पीकविमा, शासकीय अनुदान व दुष्काळी मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

ई-पिक पाहणीची सुविधा तातडीने सुरू करून सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करावी, अशी मागणी करत शेतकरी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या देऊन बसले. यावेळी डिझेल सोबत आणल्याने प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेतली. यावेळी संतोष बोराडे, ॲड .विलास पवार, पंडीत बोराडे, बालाजी बोराडे, दयानंद बोराडे, कैलास बोराडे, मनोज पाटूळे, संदीप बोराडे, वैभव शिंदे, सुमीत शिंदे, श्रीकांत बोराडे उपस्थित होते .


भूम तालुक्यातील सावरगाव (दे) या गावातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणे होताना नकाशा अपलोड होत नाही. त्यासंदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू आहे. येत्या दोन दिवसांमध्ये नकाशा अपलोड होण्याचे काम पूर्ण होणार आहे .

रेश्मा वेदपाठक

दुरुस्त लिपिक भुमिअभिलेख 


 
Top