धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला आता गती मिळाली आहे. तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील सुमारे 450 एकर क्षेत्रावर देशी, औषधी आणि आयुर्वेदिक वृक्षांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिमा साकारण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या माध्यमातून प्रस्ताव शासनस्तरावर पुढे नेण्यासाठी सकारात्मक पाऊल पडल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील गट क्रमांक 344 आणि 418 मधील जागेचा यासाठी विचार करण्यात आला आहे. विविध प्रजातींची नियोजनबद्ध लागवड करून जमिनीवरून तसेच आकाशातूनही स्पष्टपणे दिसेल, अशा भव्य आकारात शिवरायांची प्रतिमा साकारण्याची कल्पना आहे. या निसर्गशिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ते दगड, धातू किंवा काँक्रीटचे पारंपरिक स्मारक नसेल, तर वृक्ष, झुडपे आणि वनस्पतींनी साकारलेले ‌‘जिवंत' शिल्प असेल. ऋतुमानानुसार वनस्पतींच्या रंगछटा बदलत असल्याने त्याचे रूपही वर्षभर बदलत राहणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाहिल्यास या भव्य प्रतिमेचे विहंगम दृश्य अधिक प्रभावी ठरणार आहे. या उपक्रमामागे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिनव पद्धतीने अभिवादन करून देशी वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, पर्यटनविकास आणि रोजगारनिर्मिती अशी व्यापक उद्दिष्टे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


रामलिंग अभयारण्य विकासासाठी पुढाकार

धाराशिव तालुक्यातील येडशी-रामलिंग वन्यजीव अभयारण्याचा नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकास करून निसर्ग पर्यटनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभयारण्याची समृद्ध जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांसमोर प्रभावीपणे आणण्यासाठी मूलभूत सुविधा, निसर्गभ्रमंतीच्या वाटा तसेच पर्यटनपूरक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रस्तावित जंगल सफारीमुळे पर्यटकांना येथील वन्यजीव व निसर्गसंपदेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. स्थानिक युवक व नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


 
Top