धाराशिव (प्रतिनिधी)-  यंदाचा पावसाळा हा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने व पावसात दीर्घ खंड पडल्याने शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षा पेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यासोबत गुरांसाठी पाणी आणि चारा छावण्यासाठी आतापासून नियोजन करण्यात यावे,असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मुंबई येथील मंत्रालयातील दालनातून जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेताना पालकमंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता थोरात,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,कृषी विकास अधिकारी  पाटील,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर यांची तर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे, तालुकास्तरीय यंत्रणाचे अधिकारी व्ही.सी.द्वारे सहभागी होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,आतापासूनच शेतकऱ्यांना आवाहन करून पाण्याची बचत करण्यास सांगावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे.शाळेतील स्वच्छतागृहासाठी पाण्याच्या वापरासाठी आवश्यक ठिकाणी टाक्या बसवाव्यात.ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात देखील यावेळी तीव्र ऊन राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होणार नाही, याची शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी.आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराच्या पुरेशा सुविधा असतील याची दक्षता आतापासून घ्यावी,असे सरनाईक यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी स्थितीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठकीत दिली. 


सोयाबीनवर सर्वाधिक शेतकऱ्यांची भिस्त

जिल्ह्यात सर्वाधिक 4 लाख 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या 87 टक्के क्षेत्रावर सोयाबीन असून जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळे पावसातील खंडाचा फटका सोयाबीनला बसल्यास त्याचा थेट परिणाम मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे.

 
Top