वाशी (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शीचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जयकुमार शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाने युवा महोत्सवामध्ये चार प्रथम व चार द्वितीय पारितोषिके प्राप्त केली. तसेच महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ललित विभागाची जनरल चॅम्पियनशिप प्राप्त झाली.

महाविद्यालयाने किरण कांबळे(सुगम गायन), करण पवार आणिदिग्विजय वाघमारे ( मृदुमूर्ती कला) या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच महाविद्यालयाने शहरातून काढलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाची छाप उमटवली.तसेच सानिका कारंडे (रांगोळी),  मुकाभिनय (कुमारी आकांक्षा शिरसागर, करण पवार, संतोष चेडे, दिग्विजय वाघमारे, रोहन उंदरे आणि अमित देशमुख.). अमित देशमुख (स्पॉट फोटोग्राफी )आणि  निकिता जगताप, आकांक्षा शिरसागर, करण पवार आणि दिग्विजय वाघमारे (इन्स्टॉलेशन )या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे बापू यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कोठावळे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास चौधरी तसेच सांस्कृतिक विभागातील सदस्य प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, प्रा. अश्विनी नवले, प्रा. सुनीता डोके, प्रा. डॉ. नेताजी देशाई, प्रा. डॉ. महेश गुरमे, प्रा. डॉ. जयप्रकाश चोरघडे, प्रा. प्रियांका गादेकर प्रा. श्यामसुंदर डोके, प्रा. चेतना जगताप, प्रा. शालन जगताप, प्रा. साधना तांबे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जयकुमार शितोळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून महाविद्यालयाने यापुढेही यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखावी अशा शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था , महाविद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास वाशी नगरीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे हे आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना सुरेश कवडे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव देऊन त्यांची जोपासना करावी. तसेच मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास चौधरी यांनी केले. अहवाल वाचन प्रा. श्यामसुंदर डोके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील आवारे यांनी केले. तर प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

युवा महोत्सवातील महाविद्यालयाच्या या यशासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे महाविद्यालयाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कोठावळे यांनी केला.

 
Top