भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवर्डा, ता. भूम, जि. धाराशिव येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन अत्यंत खेळीमेळीच्या, उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षकांच्या सहभागातून शाळेच्या प्रगतीला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी आयोजित बैठकीस पालक सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. उपस्थित पालक सदस्यांमधून अरविंद कुटे यांची अध्यक्षपदी, तर भागवत मुंडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी  सुरेश गोपाळघरे व युवराज काळे यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधींमधून राधा मुंडे, प्रतीक्षा मुंडे, दिपाली भोसले, गीतांजली मुंडे, स्वाती मुंडे, निलावती मुंडे व प्रियांका मुंडे यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून रमेश लगाडे, तर सदस्य सचिव म्हणून  प्रमोद ठाकरे यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे उपस्थित पालक व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, शाळेतील भौतिक सुविधांचा विकास करणे तसेच पालकांचा शाळेच्या कामकाजातील सहभाग वाढविणे याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पालकांचा सक्रिय सहभाग आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. या भावनेतून नवीन समितीने शाळेच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.

अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पुनर्गठनामुळे शाळेच्या विकासासाठी पालक, शिक्षक व समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
Top