धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दिनांक 11 ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. परंपरेनुसार त्याआधी 3 ऑक्टोबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून, 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
नवरात्र काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत विभागाकडून 24 तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांना रस्त्यावरील अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर 22 प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच साथरोग नियंत्रण पथके नियुक्त केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्सही सज्ज राहतील. नगर परिषदेच्या वतीने शहरातील भौतिक सुविधा दिल्या जाणार आहेत त्यामध्ये मंडप उभारणी, घाटशीळ येथे दर्शन मंडप, चप्पल स्टँड, लॉकर सुविधा, भवानी कुंड येथे स्नानगृह, शहरात भाविकांसाठी विश्रामकक्ष, शहरात 200 मोबाईल टॉयलेट, भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, तसेच भवानी कुंड परिसरात शौचालय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
2800 पोलिसांचा फौजफाटा
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 2 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील. पोलिस विभागाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव काळात वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. एकूणच, तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेसह स्वच्छता, आरोग्य आणि सोयी-सुविधांवर प्रशासनाकडून विशेष भर दिला जात आहे.
यांची होती उपस्थितीत
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी विद्यालयात झालेल्या आढावा बैठकीला पोलिस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, आपसिंगेकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
