धाराशिव (प्रतिनिधी)-  कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनचे 99.99 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरात पाण्याची चाचणी घेण्याचेही नियोजन आहे. तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावात कृष्णेचे पाणी प्रत्यक्ष दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईच्या लक्षात घेऊन हे पूर्वनियोजन सुरू केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यातील मुंगशी गावाजवळ वीज वाहून नेण्याच्या कामात काही शेतकरी बांधवांच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे काम रखडले होते. संबंधित शेतकरी बांधवांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे, जमिनीखालून केबल टाकण्याचे कामही पूर्ण होत आले आहे. त्यानंतर घाटणे बॅरेजजवळील उर्वरित कामे पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी रामदरा तलावात सोडण्याची चाचणी घेतली जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. प्रकल्पाच्या कामाचा आमदार पाटील स्वतः नियमित आढावा घेत असून, संबंधित विभागांच्या बैठका घेऊन अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 11,700 कोटी रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्पाला मोठी गती मिळाली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.


पाणीटंचाईत रामदरा ठरणार आधारवड

उजनी धरणातून भीमा-सीना जोड बोगद्याद्वारे कृष्णेचे पाणी सीना नदीत आणले जाईल. पुढे हेच घाटणे बॅरेज आणि तेथून रामदरा तलावात येणार आहे. रामदरा तलावाची 20 द.ल.घ.मी. एवढी पाणी साठवण क्षमता आहे. तीव्र पाणीटंचाईच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. जिल्ह्यातील इतर भागातही टँकरद्वारे रामदरा तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय त्यामुळे दूर होणार आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे टंचाई कालावधीत रामदरा तलाव जिल्हावासियांसाठी मोठा आधारवड ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 
Top