भूम (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या डीबीटी ऑनलाइन प्रणाली बंद असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील हजारो दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांपासून अनुदान रखडले असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेने केला आहे. याबाबत तहसीलदार, भूम यांना निवेदन देत प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली. 

निवेदनात म्हटले आहे की, डीबीटी ऑनलाइन प्रक्रिया बंद असल्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान नेमक्या कोणत्या कारणामुळे थांबले आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. परिणामी अनेक दिव्यांग बांधवांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. याशिवाय टेम्पररी स्वरूपात ऑफलाइन मंजूर करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदानही बंद करण्यात आले असून ते तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने राज्य सरकारला इशारा देत म्हटले आहे की,  डीबीटी ऑनलाइन प्रणाली तात्काळ सुरू करून सर्व प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. अन्यथा गुरुवार, दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून भूम तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने सुमारे 200 दिव्यांग बंधू-भगिनी आमरण उपोषणास बसतील. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जिल्हाधिकारी धाराशिव तसेच सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ, सरचिटणीस चांदपाशा शेख, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब मुळे, तालुका अध्यक्ष हनुमंत बोराडे, तसेच वैभव शेळवणे, कुंदन कांबळे, राजू टाळके, चंद्रकांत मोहिते, सिंधूबाई फाळके, इंदु उंबरदंड, महेमुद मोगल, संजय नागरगोजे, राजू शेख, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.


 
Top