भूम (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या वतीने मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी धाराशिव शहरातील सिद्धाई हॉटेल येथे PIB वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 9 वाजल्यापासून चहा-नाश्त्याची व्यवस्था, सकाळी 10 वाजेपर्यंत प्रवेश व नोंदणी प्रक्रिया आणि सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली आहे. सहभागी पत्रकारांना शासकीय नियमानुसार प्रवास खर्चाची रक्कम देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काही मोजक्या पत्रकारांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून, ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना या महत्त्वपूर्ण वार्तालापापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
ग्रामीण भागाचा आवाज कोण मांडणार?
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, ग्रामपंचायती, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, सिंचन, शेती, बेरोजगारी आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न सातत्याने माध्यमातून मांडत असतात.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन जाणून घेणारा पत्रकारच त्या समस्यांचे वास्तव चित्र प्रशासन आणि शासनासमोर प्रभावीपणे मांडू शकतो. असे असताना ग्रामीण भागातील पत्रकारांनाच PIB च्या वार्तालाप कार्यक्रमासाठी निमंत्रण न देण्यामागचे निकष नेमके काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
PIB वार्तालापाचा उद्देश नेमका काय?
पत्रकार आणि शासन यांच्यात संवाद वाढविणे, केंद्र शासनाच्या योजना व धोरणांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविणे तसेच पत्रकारांकडून विविध प्रश्न जाणून घेणे, हा अशा प्रकारच्या वार्तालापाचा उद्देश असतो. मग या संवादाच्या व्यासपीठावर ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रतिनिधित्व नसेल तर गावखेड्यातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचणार कसे? असा प्रश्न ग्रामीण पत्रकारांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागात विविध माध्यमांसाठी काम करणारे अनेक पत्रकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करीत आहेत. मोबाईल, इंटरनेट, प्रवासाचा खर्च आणि अन्य अडचणी असतानाही ते गावागावातील बातम्या आणि नागरिकांचे प्रश्न सातत्याने पुढे आणतात. अशा पत्रकारांना शासकीय संवादाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे ही बाब खटकणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
निमंत्रणाचे निकष जाहीर करण्याची मागणी
PIB वार्तालापासाठी पत्रकारांची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली? जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांची यादी तयार करण्यात आली होती का? निमंत्रण देताना माध्यमांचे स्वरूप, कार्यक्षेत्र आणि स्थानिक प्रश्न मांडण्याचे योगदान विचारात घेण्यात आले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणेने स्पष्ट करावीत, अशी मागणी होत आहे.
एका बाजूला 'ग्रामीण भागाचा विकास', 'गावागावातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना' आणि 'माहितीचा प्रसार' यावर भर दिला जात असताना, दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील पत्रकारांनाच संवादाच्या कार्यक्रमातून वगळले जात असल्यास ही विसंगती गंभीर असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये सुरू आहे.
मोजक्यांचा संवाद की सर्वसमावेशक वार्तालाप?
PIB अवार्तालाप हा काही मोजक्या पत्रकारांचा कार्यक्रम न राहता जिल्ह्यातील सर्व भागांचे प्रतिनिधित्व करणारा सर्वसमावेशक संवाद असावा, अशी अपेक्षा ग्रामीण पत्रकारांकडून व्यक्त होत आहे.
शहरी भागातील प्रश्नांइतकेच ग्रामीण भागातील प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी पत्रकारांची निवड करताना केवळ काही मोजक्या माध्यम प्रतिनिधींवर भर न देता तालुका व ग्रामीण पातळीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या पत्रकारांनाही समान संधी देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. गावखेड्यातील जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांनाच शासनाच्या संवादाच्या व्यासपीठावर स्थान नसेल, तर हा संवाद नेमका कोणासाठी? असा थेट सवाल ग्रामीण पत्रकारांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित यंत्रणा याबाबत काय स्पष्टीकरण देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.