धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षित पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाळ्याचे चारही महिने संपत आले असून जिल्ह्यातील 225 प्रकल्पांमध्ये केवळ 7.32 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तेरणा मध्यम प्रकल्पातही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. सध्या 6 गावांना 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून 195 पाणीस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. डिसेंबरनंतर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता असून जानेवारी ते जून 2027 हा कालावधी जिल्ह्यासाठी पाणीटंचाईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक झाली आहे. पावसाळ्याचे चारही महिने संपत आले असून पुढील काळात समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठा असलेला सीना कोळेगाव प्रकल्प सध्या कोरडाठाक पडला असून त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे परंडा तालुक्यांतील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा प्रकल्पही तळाकडे जात आहे. जिल्ह्यात एकूण 225 पाणी प्रकल्प असून त्यामध्ये एका मोठ्या प्रकल्पासह 17 मध्यम आणि 207 लघु प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. 17 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 6 टक्के, तर 207 लघु प्रकल्पांमध्ये 9 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा केवळ 7.32 टक्क्यांवर आला आहे. इतक्या गंभीर स्वरूपाची पाणीटंचाईची परिस्थिती यापूर्वी कधी निर्माण झाली नव्हती, अशी स्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील 6 गावांना 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून या टँकरच्या 78 फेऱ्या मंजूर आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एकूण 195 पाणीस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी 178 अधिग्रहित स्रोतांच्या माध्यमातून काही गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 110 गावांसाठी 195 विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 594 कामे सुरू आहेत. त्यापैकी 346 कामे पूर्ण झाली असून 248 कामे अद्याप प्रगतिपथावर आहेत. अपुऱ्या कामामुळे एखाद्या गावात पाण्याचे टँकर लावल्यास त्याचा खर्च त्या गावाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने देणे बंधनकारक आहे. असा स्पष्ट आदेश प्रशासनाने दिला आहे.
