धाराशिव (प्रतिनिधी)- लोकांना मदत करण्याच्या नावाखाली जकात जमा करण्याचे आमिष दाखवून वैयक्तिक बँक खात्याचा क्यूआर कोड देत पैसे उकळले गेल्याचा प्रकार समोर आला असुन या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर युनिट व धाराशिव कॅम्पचे एटीएस पथकाने धाराशिव येथील 2 जणांना अटक केली आहे. स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या नावाचा वापर करीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव येथील बँकेचा क्यूआर कोड देण्यात आला. पोलिस निरीक्षक कुमार दराडे हे तपास करीत आहेत.
नागरिकांना जकात देण्याचे आवाहन करीत स्वतःच्या बँक खात्यावर पैसे घेण्यात आले. असलम चांदपाशा शेख (रा. खाजानगर) आणि निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) या 2 जणांची नावे समोर आली आहेत. दोघांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर वैयक्तिक खात्याचा क्यूआरकोड शेअर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जकातीच्या नावाखाली आतापर्यंत किती रक्कम जमा करण्यात आली, ती कुठे व कशासाठी वापरण्यात आली, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एटीएसकडून बँक खाते व इतर माध्यमातून सुरू आहे. याप्रकरणी एटीएसचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फैय्याजोद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी काळात गुन्ह्याची व्याप्ती वाढू शकते. काझी यांनी 100 रुपये टाकले तेव्हा ते वयक्तिक खात्यावर गेल्याने बिंग फुटले.
सोशल मीडियावर जकात व मदतीसाठी आवाहन केले जात होते. यामध्ये स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या नावाचा संदर्भ देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात होता. पोस्टमध्ये भारतीय स्टेट बँकेचा खाते क्रमांक व आयएफएससी कोड देण्यात येत होता. त्यासोबत वैयक्तिक बँक खात्याचा क्यूआर कोडही शेअर केला जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून रक्कम पाठविल्यानंतर ती संस्थेच्या खात्यात न जाता वैयक्तिक खात्यात जमा होती.