धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तारोको करून जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. दुपारी नंतर मात्र अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू केली. जिल्ह्यात सर्वत्र बंद शांततेत पाळण्यात आला. 

जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व सरकारच्या निषेघार्थ धाराशिव, तुळजापूर आदी ठिकाणी रास्तारोका आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे सोलापूर-संभाजीनगर व तुळजापूर-हैदराबाद या महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या 5 ते 10 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवास करणाऱ्या काही व्यक्तींनी संताप व्यक्त केला. सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य करून आंदोलन संपविणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, कॉलेज बंद ठेवून जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यात आला. धाराशिव शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.  


तुळजापूरमध्येही प्रतिसाद

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तामलवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. 3) तामलवाडी गावासह तामलवाडी टोलनाक्यावरील व्यापारी व व्यावसायिकांनी आपली दुकाने, हॉटेल्स व अन्य व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.


परंड्यातही प्रतिसाद

तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाने गुरुवारी दि.3 रोजी सकाळी परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन केले व परंडा तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांना निवेदन देण्यात आले. परंडा बंदला ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, बाजारपेठ ठप्प होती.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली.

 
Top