धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‌‘सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ‌‘सेवा परमो धर्मः' या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे.त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत शासनाने ‌‘सेवा संकल्प अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहचविण्यासाठी जिल्ह्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

अभियान कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.जिल्ह्यातील विविध कार्यालयांच्या पुढाकाराने सेवा सेतूच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शिबिरांमध्येच सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय यंत्रणांची आज 21 सप्टेंबर 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली.जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी व नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

अभियानात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा,जिवंत सातबारा मोहीम, 7/12 व 8-अ नोंदी अद्ययावत करणे,गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप तसेच जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातील जमिनीच्या मोजणीशी संबंधित प्रकरणांना गती दिली जाणार आहे.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेले रहिवासी प्रमाणपत्र,नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र,आर्थिक मागास प्रमाणपत्र,महिला शेतकरी प्रमाणपत्र,दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी,जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आदी विविध प्रकारच्या सेवा गावपातळीवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अभियानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्यात व तालुक्यांत जास्तीत जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या भागात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून ‌‘सेवा संकल्प अभियानाचा' लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.


 
Top