वाशी (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन राजेशजी ढेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या कर्जदार तसेच बिगर कर्जदार सभासदांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी 11 लाख रुपयांची विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष तथा संचालक संतोषराव मोळवणे यांनी मांडला. उपस्थित सभासदांनी या ठरावास एकमताने मंजुरी दिली.
सभेदरम्यान संस्थेच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या आर्थिक वर्षात संस्थेला 34 लाख 24 हजार 104 रुपयांचा नफा झाल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सभासदांच्या शेअर्सवर 15 टक्के लाभांश, तसेच उर्वरित जमा कायम ठेवींवर 9 टक्के दराने नफा वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती देण्यात आली. सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. चौथी-पाचवी व सातवी-आठवी शिष्यवृत्तीधारक, नवोदय प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेले विद्यार्थी, नीट व इंजिनिअरिंग परीक्षा उत्तीर्ण तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्णजी तांबारे सर यांचा सपत्नीक भरपेहरावासह सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे सेवानिवृत्त सभासद, नवनियुक्त केंद्रप्रमुख, नवनियुक्त मुख्याध्यापक व नवनियुक्त शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. सभेस राज्य संघाचे भक्तराज दिवाने, सोमनाथ टकले, अनुराधा देवळे, जिल्हा सरचिटणीस तथा माजी चेअरमन विठ्ठल माने, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर भालेकर, संस्थापक सचिव निशिकांत आडसूळ, महादेव खराटे, दत्ता पवार, राजेंद्र बिक्कड, अंगद मिसाळ, प्रशांत घुटे, बोरकर सर, टेळे सर, विजयसिंह रणखांब, प्रशांत जाधवर, नारायण इंगळे, प्रकाश नरसिंगे, ऑडिटर कल्याण तांबारे, तालुका संघाचे संजय अंबुरे, मुकुंद मेदने, रणजीत कवडे यांच्यासह असंख्य सभासद बंधू-भगिनी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
सभेचे प्रस्ताविक व्हा. चेअरमन राजकुमार गुंजाळ यांनी केले. सचिव संगपाल सुकाळे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन संचालक शिवशंकर राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन आयुब शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक कल्याणजी सुरवसे, पंच वागीश स्वामी, संचालक बाबुराव माने, शहाजी कोकाटे, सुहास नन्नवरे, सखाराम शिंदे, बालाजी ढाणे, अशोक बिक्कड, उषा डिसले, सारिका चौधरी, प्रवीण कुंभार, दत्तात्रेय डिसले व सुधीर उंदरे यांनी परिश्रम घेतले.
