धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची सद्यस्थिती जाणून घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‌‘चला शाळेत जाऊया' हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1,080 जिल्हा परिषद शाळांना एकाच दिवशी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळा भेटी केल्या आहेत. 

या विशेष मोहिमेत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, शिक्षणाधिकारी कैलास पिकवणे, यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, वर्ग-1, वर्ग-2 तसेच वर्ग-3 स्तरावरील क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते. यांनी विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन पाहणी केली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच, माजी विद्यार्थी संघ, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ यांचेशी अधिकारी यांनी संवाद साधला.  भेटी दरम्यान प्रत्येक शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा आणि आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची माहिती एका निर्धारित फॉर्मद्वारे संकलित केली. वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, संगणक, डिजिटल सुविधा, क्रीडा साहित्य, फर्निचर आदी विविध बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. ज्या सुविधांची कमतरता जाणवते आहे त्याचा प्राधान्य क्रमही भरून घेण्यात आला आहे.

या विशेष शाळा तपासणी मोहिमेत शाळांकडून ‌‘' मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे यापूर्वीच गोळा केलेल्या भौतिक सुविधांची माहितीचीही पडताळणी केली. यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती उषाताई रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतील ‌‘सात ते नऊ  टीव्ही व मोबाईल बंद, अभ्यास सुरू' या उपक्रमाचाही याच भेटीदरम्यान आढावा घेतला आहे. 


 
Top