धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा महाविद्यालय स्तरीय पदवी वितरण समारंभ संपन्न झाला.

 यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य अनिल साकोरे, पुणे व मराठवाडा विभाग प्रमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी वरील प्रतिपादन केले. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचा आदर्श तरुणांच्या समोर असणे गरजेचे आहे. आज पदवीनंतर तरुणांच्या हाती काम नाही, शिक्षणामुळे फक्त व्यक्तिमत्त्व विकास होईल हे जरी खरे असले तरी विकसित झालेल्या व्यक्तिमत्वाचा आर्थिक विकास होणे ही तितकेच गरजेचे आहे. सत्याचा मार्गावर आयुष्याचा प्रवासात अनेक चढउतार येणार आहेत. पण प्रवास अर्ध्यावर सोडून वापस येणं बरे नव्हे,आपले आदर्श तपासून घ्यावे लागतील. क्षणभंगुर आनंदापायी अखंड आयुष्य पणाला लावता येणार नाही, आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यातच जगण्याची दिशा सापडेल असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर म्हणाले की,पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आई वडीलांचे कष्ट लक्षात ठेवावी लागतील, आपल्या समोर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श आहेत, परिस्थिती सतत अनुकूल असेलच असे नाही,पदवी प्राप्त झाल्यानंतर आपल्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू होईल , तरुणांना आपला परिवार आणि समाज या दोहोंमध्ये संतुलन स्थापीत करुन स्वतःला घडवावे लागेल व स्वतःच्याच आयुष्याचा शिल्पकार व्हावे लागेल  असे अनमोल विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय समापनात नानासाहेब पाटील, सदस्य महाविद्यालय विकास समिती हे म्हणाले की, इमानदारीने, स्वकष्टाने प्राप्त केलेले यश हे कायम स्वरुपी टिकणारे असते, शाश्वत यश प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचा आडमार्ग नाही हे तरुण पिढीने लक्षात ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदर प्रसंगी जयप्रकाश पाटील, सहाय्यक मराठवाडा विभाग प्रमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, विजयकुमार घोडके, डॉ.कुदळे आदींची उपस्थिती होती. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.माधव उगिले यांच्या सह सर्व विभाग प्रमुखांचे उत्तम सहकार्य लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार डॉ मंगेश भोसले यांनी मानले


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top