धाराशिव (प्रतिनिधी)-  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये 'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांना यंत्रसामग्री खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'एक गाव, एक कृषी अवजारे बँक' या संकल्पनेनुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्प गावातील एमएसआरएलएम (उमेद) व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या घटकासाठी पात्र आहेत. एका गावातून एकापेक्षा अधिक गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. यापूर्वी ऑनलाइन लॉटरीद्वारे 03 महिला गटांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित पात्र गावस्तरीय कृषी अवजारे बँक घटकासाठी एफपीओ-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दि.31 ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण केलेल्या प्रकल्प किमतीच्या 60 टक्के अनुदान देय राहणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला शेतकरी केवळ शेतीपुरत्या मर्यादित राहता शेतीपूरक व्यवसाय, यंत्रसामग्री व्यवस्थापन व सेवा क्षेत्रातही पुढे याव्यात, हा उद्देश आहे. कृषी अवजारे बँके मुळे महिला गटांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होण्यासोबतच गावातील शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री वेळेवर भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे. 

या अंतर्गत लहान किंवा मोठा ट्रॅक्टर तसेच किमान तीन कृषी अवजारे घेता येईल, योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी श्रीराम हेलाले, प्रकल्प विशेषज्ञ कृषि व्यवसाय धाराशिव यांना संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला बचत गटांनी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) विष्णु मिसाळ यांनी केले आहे.


 
Top