परंडा (प्रतिनिधी)- आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने यशस्वी व्हावे, चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात मोठे स्थान मिळवावे, अशी मनापासून इच्छा असते. ही अपेक्षा चुकीची नाही; परंतु जेव्हा अपेक्षांचे रूपांतर दबावात होते, तेव्हा मुलांच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा असणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांनो, तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा. तुमच्या शिक्षणासाठी, गरजांसाठी आणि भविष्यासाठी ते अनेक अडचणी सहन करतात. मात्र, त्यांच्या अपेक्षा तुमच्या आवडीशी किंवा क्षमतेशी जुळत नसतील तर मनात ठेवून त्रास करून घेऊ नका. शांतपणे त्यांना सांगा “आई-बाबा, मला या क्षेत्रात रस नाही; मला दुसऱ्या क्षेत्रात माझे भविष्य घडवायचे आहे.” तुमच्या आवडीनिवडी, क्षमता, स्वप्ने आणि अडचणी पालकांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मुलांना केवळ आपल्या अपेक्षांच्या चौकटीत पाहू नये. प्रत्येक मूल वेगळे असते. त्याची बुद्धिमत्ता, आवड, क्षमता आणि स्वप्ने वेगळी असतात. म्हणून मुलाची इतर मुलांशी तुलना न करता त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही, एखाद्या परीक्षेत अपयश आले किंवा एखादे स्वप्न काही काळासाठी अपूर्ण राहिले, म्हणून आत्महत्या हा कधीही पर्याय नाही. अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नसून नव्या प्रयत्नाची सुरुवात असते. आज मिळालेले अपयश उद्या मिळणाऱ्या यशाचा मार्ग दाखवू शकते. त्यामुळे अडचणीच्या क्षणी एकटे राहण्याऐवजी आई-वडील, शिक्षक, मित्र किंवा विश्वासातील व्यक्तीशी बोलले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांसाठी केवळ पैसा आणि सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नाही; त्यांना आपला वेळ आणि आपले मनही द्यावे लागते. मुलांबरोबर बसून त्यांच्या शाळा-महाविद्यालयातील अनुभवांबद्दल, मित्रांबद्दल, आवडी-निवडींबद्दल आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल चर्चा केली पाहिजे. घरातील महत्त्वपूर्ण विषयांवरही मुलांचे मत विचारले पाहिजे. त्यामुळे घरात संवादाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होते. काही वेळा पालक आपल्या मुलांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा ठेवतात. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की पालक निराश होतात, स्वतःला त्रास करून घेतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या वातावरणावर होतो. त्याऐवजी मुलाने एखाद्या परीक्षेत किंवा प्रयत्नात यश मिळवले नाही, तर त्याला रागावण्याऐवजी प्रेमाने सांगावे “ठीक आहे, यावेळी जमले नाही. पुन्हा प्रयत्न कर. आम्ही तुझ्यासोबत आहोत.” या एका वाक्यात मुलाला मोठा आधार मिळतो. त्याला जाणवते की माझे आई-वडील माझ्यावर विश्वास ठेवतात. माझ्यासाठी ते कष्ट करतात, माझ्या गरजा पूर्ण करतात आणि माझ्या अडचणीच्या काळातही माझ्या पाठीशी उभे राहतात. ही जाणीव मुलाला अधिक जबाबदार आणि संवेदनशील बनवते. घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत; घर म्हणजे प्रेम, विश्वास, संवाद आणि सुरक्षिततेची भावना. मुलांना आपल्या घरात आपलेपणा जाणवला पाहिजे. पालकांनी मुलांचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि मुलांनीही पालकांच्या कष्टांची व त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. आजच्या काळात गरज आहे ती अपेक्षांपेक्षा संवादाची, दबावापेक्षा विश्वासाची आणि रागापेक्षा प्रेमाची. पालकांनी मुलांच्या स्वप्नांना समजून घेतले आणि मुलांनी पालकांच्या कष्टांचा आदर केला, तर अनेक कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. प्रत्येक मुलाला हे जाणवले पाहिजे की, “मी अपयशी झालो तरी माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत.” आणि प्रत्येक पालकाला हे समजले पाहिजे की, “माझ्या मुलाचे यश म्हणजे केवळ गुण किंवा नोकरी नव्हे; तर त्याचे आनंदी, समाधानी आणि सुरक्षित जीवन हेच खरे यश आहे.” मुलांच्या मनातील भावना समजून घेऊया, त्यांच्या स्वप्नांना दिशा देऊया आणि त्यांना आयुष्य जगण्याची उमेद देऊया.
