भूम (प्रतिनिधी)- कोष्टी समाजाच सर्वस्व असलेला हातमाग विणकर व्यवसाय शासनाचा दुर्लक्षितपणा अन् आधुनिकी करणामुळे संपुष्टात येऊ लागला आहे. याला पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी हातमाग विणकर महामंडळाला मोठ स्थैर्य मिळवून द्यावे. अशी अपेक्षा ज्येष्ठ हातमाग विणकर राजाभाऊ पाकले यांनी हातमाग विणकर दिनी बोलताना केले.
शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सर्वत्र हातमाग विणकर दिन साजरा केला. भूम येथील कोष्टी समाज बांधवांनी देखील श्री चौंडेश्वरी देवी मंदिरमध्ये मोठ्या उत्साहात हातमागाचे विविध सुटे भाग एकत्रित संकलित करून त्याची विधिवत पूजाअर्चा करून हातमाग विणकर दिन साजरा केला. हा व्यवसाय सद्यस्थितीत संपुष्टात येऊ लागला असला तरी प्रत्यक्षात ज्यांनी हातमागावर विणकाम केलेले आहे त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी व्यक्त केला. तसेच हातमाग व्यवसाय संपुष्टात येऊ लागल्यामुळे दुःखही व्यक्त केले.
या दरम्यान हातमागाचा मोठा चरखा, छोटा चरखा, फणी, कांड्या, भरणेचे यंत्र, माग, कळी, वाकपट्टी, थापा या सुट्या भागाचे पूजन केले. यानंतर ज्येष्ठ हातमाग विणकरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये पार्वतीबाई दाते, कमलबाई म्हेत्रे, गोदावरीबाई वरवडे, सिंधुबाई बागडे, जाईबाई होगाडे, मंगलबाई नवले, मंगलबाई भसाकरे, राधाबाई दिवटे, चंद्रकला सोनटक्के, मिनाबाई बागडे, पद्मीनबाई आसलकर, सुभाष ऊपरे, बाबूराव आलगट, कांतलिंग खामकर, आबा नवले, बाळासाहेब फासे, राजाभाऊ पाकले, विजय खामकर, पांडूरंग वखडे, पांडूरंग बुगड, भारत बागडे, मधूकर ऊपरे, हरिभाऊ बागडे, सातिश कोकणे, शंकर बोत्रे, शाम दिवटे, प्रकाश बागडे आदींचा सत्कार केला.
विणकर दिन साजरा करण्यासाठी कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष तथा नगरसेवक विठल बागडे, उपाध्यक्ष शाम वारे, सचिव शंकर खामकर, नवनाथ रोकडे, योगेश आसलकर, सतिश दाते यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शंकर खामकर यांनी केले.
