तुळजापूर (प्रतिनिधी)- जात वैधता प्रमाणपत्र असतानाही कुणबी नोंदी रद्द करणाऱ्या सरकारचा डाव हाणून पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूरमध्ये दिला आहे. मराठा समाजाला कुणबी आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम महाराष्ट्राच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील शनिवारी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून मराठा समाजबांधव व शिवभक्तांना संबोधित केले.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारमधील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली. कुणबी नोंदी असलेल्या समाजबांधवांची जात वैधता प्रमाणपत्रे असतानाही कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्याचा दावा करत, हा प्रकार मराठा समाजाविरोधातील षडयंत्र असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारच्या या कथित षडयंत्राविरोधात सकल मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन अथवा उपोषण करण्याची हाक देण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. 29 ऑगस्ट रोजी कोणीही घरी राहू नये आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी सावरगाव येथील सभेत केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित मराठा समाजबांधव व शिवभक्तांनी प्रतिसाद दिला.
