धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांच्या वतीने खेड येथे एकदिवसीय वृक्षलागवड शिबिर उत्साहात संपन्न झाले. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित ग्रामनिर्मितीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खेडचे सरपंच सुनिल गरड आणि उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांच्या मार्गदर्शनात शिबिर आयोजन करण्यात आले.

शिबिराची सुरुवात वृक्षदिंडीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन वृक्षदिंडी काढली. त्यानंतर गाव परिसरात विविध प्रजातींच्या रोपांची वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचा समतोल आणि शेतीपूरक वृक्षांचे महत्त्व याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनीही वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाबाबत आपले अनुभव आणि विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय व अनुभव कथन केले. वृक्षलागवड शिबिरामुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली असून, प्रत्यक्ष गावपातळीवर काम करण्याचा अनुभव मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी तुुगावचे सचिन लोमटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गोविंद कोकणे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिबिर संपन्न झाले. सरपंंच सुनिल गरड यांनी  वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांच्या संगोपनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top