तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांच्या सोशल मीडिया स्टेटसवर शनिवारी अचानक ‌‘आमचं ठरलंय' अशी पोस्ट झळकल्याने तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेतील नगरसेवकांच्या बैठकीनंतर ही पोस्ट करण्यात आल्याचे समजत असल्याने या पोस्टचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

नगरपालिकेतील झालेल्या बैठकीला चार ते पाच नगरसेवक बाहेरगावी असल्याने अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे. त्यानंतर नगराध्यक्षांच्या स्टेटसवर आलेल्या ‌‘आमचं ठरलंय' या दोन शब्दांमुळे बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पोस्टबाबत प्रतिक्रिया विचारली असता संबंधितांकडून सध्या केवळ ‌‘जय महाराष्ट्र' एवढीच प्रतिक्रिया दिली जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील सक्रियतेनंतर तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये विविध हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच तुळजापूर नगरपरिषदेत निधीच्या उपलब्धतेसह विविध बाबींवर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ‌‘आमचं ठरलंय' या पोस्टचा संबंध कोणत्या राजकीय घडामोडींशी आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे

तुळजापूर नगरपरिषद प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली आहे. तुळजापूर तालुका हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. आमदारकीपासून पंचायत समिती, नगराध्यक्षपद, कृषी उत्पन्न बाजार समितीसह सहकार क्षेत्रातील विविध संस्थांवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे नगरपरिषदेतील सत्तेच्या समीकरणांमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याचे पडसाद तालुक्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून तुळजापूर नगरपरिषदेत अंतर्गत राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा अधूनमधून होत आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यातच नगराध्यक्षांच्या ‌‘आमचं ठरलंय' या सूचक पोस्टमुळे या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.


‌‘ठरलंय' नेमकं काय?

नगराध्यक्ष गंगणे यांच्या या पोस्टमागे नेमका कोणता निर्णय आहे, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोस्टचा अर्थ सत्तेतील राजकीय निर्णय, आगामी राजकीय समीकरणे की नगरपरिषदेतील अन्य विषयाशी संबंधित निर्णय, याबाबत संभ्रम कायम आहे.

तुळजापूर नगरपरिषदेतील सत्तेचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‌‘आमचं ठरलंय' या पोस्टमागचे ‌‘ठरलेले' नेमके काय आहे, हे आगामी काळातील राजकीय घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.


‌‘शुक्रवारी ओम दादा तर शनिवारी राणा दादा तुळजापुरात 

विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शुक्रवारी (दि. 21) तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे उपस्थित होते. तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे शनिवारी (दि. 22) तुळजापूर शहरात बैठकीनिमित्त आले होते. एकाचवेळी दोन्ही प्रमुख राजकीय नेत्यांची तालुक्यातील उपस्थिती आणि त्यातच नगराध्यक्षांची ‌‘आमचं ठरलंय' ही सूचक पोस्ट यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.


 
Top