धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन व्हावे, या उद्देशाने दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी ‘श्रावण सोहळा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्वाती जाधव, प्रा. भाग्यश्री गोंदकर, पालक प्रतिनिधी श्रीमती ज्योती गुंड तसेच महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण विभागाच्या सहसमन्वयक श्रीमती स्वाती डोळे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, अशा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढण्यास तसेच आपुलकीचे नाते दृढ होण्यास मदत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. छाया दापके यांनी श्रावण महिन्याचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व विशद केले. श्रावण महिन्यातील विविध सण, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राणूबाई कोरे यांनी केले. श्रावण सोहळ्याच्या निमित्ताने प्राध्यापक, माता-पालक आणि विद्यार्थिनींसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राध्यापकांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रा. शीतल गायकवाड, माता-पालकांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत श्रीमती मीरा राणे, विद्यार्थिनींच्या संगीत खुर्ची स्पर्धेत समीक्षा वीर विजयी ठरल्या. कप बॅलन्स स्पर्धेत सुरेखा राठोड, ‘तळ्यात-मळ्यात' स्पर्धेत रेवती घुटे, फुगे फुगविणे स्पर्धेत अंकिता कांबळे, तर मॅचस्टिक्स स्पर्धेत आरती रसाळ यांनी विजेतेपद मिळविले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, माता-पालक तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच पारंपरिक पद्धतीने फेर धरून श्रावण सोहळ्याचा आनंद लुटला. सांस्कृतिक परंपरा, मनोरंजन आणि महिला सक्षमीकरण यांचा सुंदर संगम घडवून आणणारा होता.
